Breaking news

अभिमानास्पद l मळवलीच्या अमित माळी यांची आंतरराष्ट्रीय यशाकडे भरारी ! चिनी ब्रिज स्पर्धेच्या भारतातील अंतिम फेरीचे पटकावले विजेते पद

लोणावळा l लोणावळा शहराच्या लगत असलेल्या मळवली गावातील अमित अरुण माळी यांनी 24 व्या चिनी ब्रिज (Chinese Bridge) चिनी भाषा प्रवीणता स्पर्धेच्या भारतातील अंतिम फेरीत चॅम्पियनशिप पटकावत संपूर्ण मावळ तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

    25 वर्षीय अमित यांचे प्री-स्कूल शिक्षण मॉडर्न इंग्लिश स्कूल, मलवली येथे झाले. पुढील शालेय शिक्षण कैवल्य विद्या निकेतन, लोणावळा आणि एमआयटी गुरुकुल स्कूल, तळेगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी विश्वभारती विद्यापीठातील (शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल) प्रतिष्ठित चीना भवन येथून चिनी भाषा आणि संस्कृती विषयात बी.ए. व एम.ए. पदवी प्राप्त केली.

सदर स्पर्धेची भारतीय अंतिम फेरी 8 जून 2025 रोजी कोलकाता येथे पार पडली. यंदा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देशभरातील 17 विद्यापीठांमधून 54 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून 7 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आणि त्या अंतिम 7 मधून अमित माळी यांनी चॅम्पियनशिप जिंकत बाजी मारली.

या स्पर्धेत 3 टप्पे होते :

1} "एक जग, एक कुटुंब" या विषयावर 5 मिनिटांचे प्रभावी भाषण.

2} चिनी कला सादरीकरण – अमित यांनी कीबोर्डवर ‘जास्मीन फ्लॉवर’ हे पारंपरिक चिनी लोकगीत सादर करून रसिकांची मनं जिंकली.

3} चिनी ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा, ज्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

     या विजयानंतर आता अमित माळी यांना चीनमध्ये होणाऱ्या जागतिक अंतिम फेरीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे चीन सरकार त्यांच्या 15 दिवसांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च उचलणार आहे. जगभरातील स्पर्धकांमध्ये आता अमित भारतासाठी स्पर्धा करतील.

     चीनी ब्रिज ही हानबान (Hanban) संस्थेद्वारे आयोजित करण्यात येणारी जगातील सर्वात मोठी चिनी भाषा स्पर्धा आहे. 2002 पासून ही स्पर्धा सुरू झाली असून आतापर्यंत 147 हून अधिक देशांतील 600 पेक्षा जास्त स्पर्धक दरवर्षी सहभागी होतात. या ऐतिहासिक यशाबद्दल अमित माळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याकडून जागतिक पातळीवर मोठ्या अपेक्षा आहेत.

इतर बातम्या