Breaking news

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा l यंदा फेसबुक दिंडीची ‘वारी अभिजात मराठीची’

देहूगाव (प्रतिनिधी) : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 340 व्या पालखी सोहळ्यानिमित्त, ‘फेसबुक दिंडी’ ने यंदा "वारी अभिजात मराठीची" अशी विशेष थीम जाहीर केली आहे. याअंतर्गत मराठी भाषेची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक समृद्धी आणि सांस्कृतिक ठेवा यांचे महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्निल राम मोरे यांनी दिली.

फेसबुक दिंडीला यंदा 15 वर्षे पूर्ण होत असून, गेल्या दशकभरापासून ही टीम पंढरीच्या वारीतील e-वारकऱ्यांसाठी फोटो, व्हिडिओ, लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून वारीचे डिजिटल दर्शन घडवते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत वेगवेगळे सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबवते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी “जैसी दीपांमाझी दिवटी, कां तिथी माझी पूर्णिमा गोमटी; तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी सर्वोत्तम” असे सांगून मराठी भाषेचा गौरव पूर्वीच केला आहे. संत साहित्यामुळे मराठी भाषेला लय, ताल, शब्दसंपत्ती, आणि भावनिक समृद्धता लाभली आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांनी आपल्या अभंग, ओव्या, भारुडांमधून अध्यात्म, तत्वज्ञान आणि सामाजिक समतेचे विचार जनसामान्यांपर्यंत मराठीत मांडले. याच साहित्यिक वारशामुळे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्यास मार्ग मोकळा झाला.

“मराठी ही केवळ संवादाचे साधन नसून ती एक सांस्कृतिक ओळख, सामाजिक ऐक्य आणि शैक्षणिक प्रगल्भतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे ही आपली जबाबदारी आहे,” असे मत मोरे यांनी व्यक्त केले.

यंदाच्या वारीत फेसबुक दिंडीच्या माध्यमातून ‘मारी अभिजात मराठीची’ ही संकल्पना विविध माध्यमांतून भाविकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या उपक्रमासाठी फेसबुक दिंडी टीमचे स्वप्नील मोरे, सुरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, मंदार जाधव, सागर गंधारे, ओंकार महामुनी, निखिल पवार, सुमित चव्हाण हे सदस्य सक्रिय योगदान देत आहेत.

तसेच, “चला रे पाहू सोहळा पंढरीचा” हे फेसबुक दिंडीचे नवीन गीत लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचे गीतलेखन आणि संगीत आनंद ओक यांनी केले आहे.

इतर बातम्या