इफेक्ट न्यूज l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगतच्या साईडपट्टी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या साईड पट्टी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात मावळ माझा न्युज ने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या साईड पट्टी दुरुस्तीच्या कामाचा प्रशासनाला विसर ही बातमी प्रसिध्द केली होती. तिची दखल घेत व पावसाळ्यात नागरिकांना यामुळे होणारा त्रास लक्षात घेत आयआरबी कंपनीच्या वतीने वरसोली, वाकसई, कार्ला परिसरात साईड पट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. डांबर खडीने ही साईड पट्टी भरली जात असल्याने पावसात चिखल होण्याचे प्रमाण देखील घटणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्टी दुरुस्तीचा प्रशासनाला यावर्षी विसर पडला आहे त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहेत. दरवर्षी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ची साईड पट्टी कडक मुरूम टाकून भरून घेतली जाते. यावर्षी मात्र या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे असे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आले होते.
कार्ला ते लोणावळा दरम्यान ही गोष्ट प्रखरतेने जाणवत आहे. साईड पट्ट्या दुरुस्ती करण्यात न आल्यामुळे डांबरी रस्त्याला लागूनच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. लहान वाहने अथवा दुचाकी गाडी रस्त्याच्या कडेला घेताना या खड्ड्यांमध्ये आदळत आहे. काही ठिकाणी आयआरबी कंपनीकडून मुरूम टाकण्यात आला आहे मात्र तो मुरूम देखील माती सदृश्य असल्यामुळे त्या भागात चिखल व पुन्हा नव्याने खड्डे पडले आहेत. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च ही साईड पट्टी दुरुस्ती करण्यासाठी केला जाते.
दरवर्षी साईड पट्टीला पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुरूम टाकून खड्डे भरून घेतले जातात. खरंतर दरवर्षी होणारा हा लाखो रुपयांचा खर्च टाळण्यासाठी शासनाने एकदाच या साईड पट्ट्यांचे डांबरीकरण करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून दरवर्षी या साईड पट्ट्या दुरुस्तीवर होणारा खर्च कमी करता येऊ शकतो तसेच चांगल्या पद्धतीची साईड पट्टी दुचाकी चालक व पादचारी यांना देखील उपलब्ध होऊ शकते याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी या बातमीतून करण्यात आली होती. त्याची देखील दखल घेत डांबर खडी टाकण्यात येत आहे.