Breaking news

भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर

लोणावळा : येथील प्रतिथयश भरत अगरवाल नागरी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी हॉटेल चंद्रलोक येथे सभासद व हितचिंतकांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. संस्थेने सलग २५ वर्षे ‘अ’ वर्ग कायम राखला असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेला १ कोटी १ लाख २५ हजार ३१८ रुपये ३८ पैसे निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्षा लता अगरवाल यांनी दिली. यावेळी सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

       सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार, संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्व. अरविंद कुलकर्णी, स्व. शरद बेंद्रे तसेच मागील आर्थिक वर्षात दिवंगत झालेले राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, सैनिक व पोलिस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने सभेच्या कामकाजास सुरुवात झाली.

      अध्यक्षा लता अगरवाल यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या २५ वर्षांपासून संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग प्राप्त होत असून, त्यामुळे सभासदांचा संस्थेवरील विश्वास वाढला आहे. संस्थेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, सभासदांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेकडे एकूण ६७ कोटी रुपयांच्या ठेवी असून, सभासदांना ४८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. विविध बँकांमध्ये संस्थेची २८ कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संस्थेचा ऑडिट अहवाल सभेत ठरावाद्वारे एकमताने मंजूर करण्यात आला.

     सभेचे औचित्य साधून शहरातील राष्ट्रीय व राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कवयित्री सिंधू जाधव यांचाही गौरव करण्यात आला.

यावर्षीपासून पतसंस्थेच्या वतीने ‘उत्कृष्ट कर्मचारी सेवा पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून, पहिल्या पुरस्कारासाठी संस्थेतील लिपिक राणी परदेशी यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सभासदांच्या दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला.

     संस्थेच्या या आर्थिक प्रगतीमुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी काळातही सभासदकेंद्रित सेवा आणि संस्थेची आर्थिक प्रगती कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष राजू दळवी, संचालक बाळासाहेब पायगुडे, सुरेश गायकवाड, मिलिंद खळदकर, रामविलास खंडेलवाल, अनिल गायकवाड, अशोक अगरवाल, ॲड. संजय गायकवाड, ऋषिकेश लेंडघर, दिनेश ओसवाल, मिलिंद वाणी, सुनंदा दाभणे, व्यवस्थापिका वासंती खिरे, समिती सदस्य हर्षल होगले, लहू गायकवाड, किशोर भोईर, संतोष परदेशी, सुरेश ढोकळे, रमेश बोंद्रे, योगिता जाधव, हरिभाऊ दळवी, अमित गंधे, सुरेश जाधव यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या