Traffic News l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा व आई एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी
लोणावळा : उन्हाळी सुट्ट्यांच्या शेवटच्या आठवड्यांचा आनंद घेण्यासाठी लोणावळा खंडाळा कार्ला व मावळ परिसरामध्ये लाखो पर्यटक मागील तीन दिवसापासून दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या या गर्दीमुळे लोणावळा खंडाळा परिसरासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी आज दिवसभर झाली होती आई एकविरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुढील आठवड्यापासून शाळांना सुरुवात होत आहे सुट्ट्यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत पर्यटन नगरी लोणावळा व आज वतीच्या परिसरामध्ये शुक्रवारपासून दाखल झाले होते.
महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेल्या आई एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती यामुळे कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान मोठे वाहतूक कोंडी झाली. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून या संपूर्ण परिसरामधील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. स्थानिक व्यवसायिक रिक्षाचालक व गावातील तरुणांनी पोलिसांच्या समवेत या ठिकाणी रस्त्यावर उभे राहत ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी दिवसभर प्रयत्न केले. खंडाळा येथील सनसेट पॉईंट जवळ सूर्यास्त पाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक शुक्रवार शनिवार व रविवार या तीनही दिवशी मोठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पर्यटन नगरी लोणावळा परिसरामध्ये पावसाला अद्याप सुरुवात झाली नसले तरी सकाळ व संध्याकाळचा आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुणे व इतर राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत आहेत.
लायन्स पॉईंट, तुंगार्ली धरण, खंडाळा बोटिंग, सहारा पुल या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरायला आले होते. खंडाळा राजमाची पॉईंट या ठिकाणी देखील व्हॅलीचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने थांबत होते. काही इंटरनॅशनल स्कूल या उद्यापासून सुरू होणार आहेत तर महाराष्ट्रातील बहुतांश सर्व शाळा या 15 जून पासून सुरू होणार आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपत आलेले आहेत शेवटच्या राहिलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी व जीवघेण्या गर्मी मधून काही काळ तरी सुटका मिळावी याकरिता पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत. पवन नगर परिसरामध्ये देखील पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली असून पवना धरणाचा समग्र परिसर हा पर्यटकांनी गजबजला आहे. मळवली रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे येथील रेल्वे गट हा रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांसह या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.





















