Breaking news

चित्रपटाप्रमाणे पाठलाग करून महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षे सक्तमजुरी; वडगाव मावळ न्यायालयाचा मोठा निकाल

वडगाव मावळ : एका निर्जन रस्त्यावर पीडित महिलेचा चित्रपटाप्रमाणे पाठलाग करून, धारदार शस्त्राचा धाक दाखवून अमानुषपणे बलात्कार करणाऱ्या ट्रक चालकाला वडगाव मावळ सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. करमवीर गुलाबराव जयस्वार असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी करमवीर जयस्वार हा संपूर्ण भारतात 'कॅरिअर ट्रक' चालवणारा चालक आहे. २०२० मधील कोविड लॉकडाऊनच्या काळात, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडने पीडित महिला एकटी जात असताना आरोपीने तिला पाहिले. त्याने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि पीडितेचा निर्जन स्थळापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर एका मोठ्या धारदार सुऱ्याचा (कोयता/सुरा) धाक दाखवून, तिला ओढत दाट झाडीत नेले व तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३७/२०२०, भारतीय दंडविधान कलम ३७६, ३७७, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी वकील ॲड. लालचंद ओसवाल यांनी सरकार पक्षातर्फे अत्यंत भक्कमपणे बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात पुढील महत्त्वाचे मुद्दे व पुरावे सादर केले. युक्तिवादानंतर, न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी करमवीर जयस्वार याला विविध कलमांखाली दोषी धरून एकत्रितरीत्या १० वर्षे सक्त कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि तत्कालीन तपास अधिकारी शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या खटल्याचा न्यायालयात सातत्याने पाठपुरावा केला. यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब गवारी, पोलीस अंमलदार अविनाश हरी गोरे आणि महिला पोलीस शिपाई राजेश्वरी सदगीर यांनी कायदेशीर प्रक्रियेत आणि साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. न्यायालयाच्या या धडक निर्णयामुळे महिलांविरोधी गुन्हे करणाऱ्यांवर कडक जरब बसेल, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

इतर बातम्या