Breaking news

Karla News l कार्ला येथे मंडप व्यावसायिकाच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात

लोणावळा : कार्ला परिसरामध्ये मंडप व्यावसायिकाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत राजमुद्रा इव्हेंट चे मालक ज्ञानेश्वर महादु हुलावळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हुलावळे यांनी आपला मंडप व्यवसाय उभारण्यासाठी मोठ्या मेहनतीने आणि सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च करून महागडे साहित्य खरेदी केले होते. हे सर्व साहित्य गोदामात ठेवले होते. आज अचानक या गोदामाला आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले.

नागरिकांचे प्रयत्न व अग्निशमन दलाची मदत

आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुण आणि नागरिकांनी तातडीने धाव घेतली. गावकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर लोणावळा नगरपालिका, वडगाव नगरपालिका आणि आयआरबी (IRB) कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.

व्यावसायिकाचे कंबरडे मोडले

ज्ञानेश्वर हुलावळे हे कारला गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहस्थ आहेत. मोठ्या मेहनतीने व कष्टाने त्यांनी आपला हा मंडप व्यवसाय उभा केला होता. मात्र आज या दुर्घटनेत गोदामातील सर्वच्या सर्व साहित्य जळून राख झाले आहे. एक मेहनती व्यावसायिकाचा व्यवसाय काही क्षणातच उध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना खूप मोठा कालावधी लागणार असून, या अचानक आलेल्या संकटामुळे हुलावळे यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शासनाने याची दखल घेत त्यांचा नुकसानीचा पंचनामा करत त्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

इतर बातम्या