मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान
मुंबई : मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार मंगल प्रभात लोढा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारी पेपरचे मुंबई आवृत्ती संपादक विवेक गिरधारी, सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, खजिनदार विवेक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक शांत संयमी व अभ्यासू नेतृत्व तसेच विविध संकटांचा सामना करून पुन्हा नव्याने उभारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सतत भरारी घेणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स हा पुरस्कार देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओ बुक देखील यावेळी प्रकाशित करण्यात आले. देशभरातील 11 नद्यांचे आणलेले पाणी जल कुंभात समर्पित करत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याला क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे नमूद केले. तसेच लोकशाहीमध्ये लोकशाहीचे चारही स्तंभ योग्य प्रमाणे टिकले पाहिजेत याकरिता सरकार म्हणून जे जे काही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहील असे देखील त्यांनी सांगितले. मागील काही काळामध्ये पत्रकार व राजकारणी हे विविध संक्रमणातून जात आहेत. पत्रकार पूर्वीसारखी निर्भयपणे पत्रकारिता करू शकत नाहीत. कोणाचे कौतुक केले तर हा पत्रकार त्या गटाचा किंवा सरकारचा किंवा विरोधकांचा अशा टीकाटिपणांना पत्रकारांना सामोरे जावे लागते. वास्तविक पाहता चांगलेच एक कौतुक व वाईट आवर प्रहार हे पत्रकारांचे कामच आहे समाजाने देखील त्याकडे त्याच पद्धतीने पाहिले पाहिजे व लोकशाहीचा हा स्तंभ टिकवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असायला हवे असे सांगितले. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाल्यामुळे माझा व पुरस्काराचा दोघांचाही सन्मान वाढला असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मराठी पत्रकार संघाकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे देखील कौतुक करत पुढे देखील याच दर्जाचे पुरस्कार आपण प्रदान करत केवळ पत्रकार कोणावर टीका करत नाही तर चांगले काम करणारेचे कौतुक देखील करतो हा देखील संदेश यामधून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केले. प्रस्तावनेमध्ये त्यांनी हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना का देण्यात आला याची माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहिले होते. मावळ तालुका व पिंपरी चिंचवड येथील देखील पत्रकार मोठ्या संख्येने पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.





















