Breaking news

भीमतीर्थ या शब्द प्रयोगाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन भाऊ खरात गट) पक्षाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

लोणावळा : लोणावळा शहरातील महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या संदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तांमध्ये "भीमतीर्थ दीक्षाभूमी" असा उल्लेख करण्यात आल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून, या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मा. सचिन भाऊ खरात गट) तर्फे पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

      या निवेदनावर महाराष्ट्र राज्य संघटक मा. फिरोजभाई मुल्ला, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. राहुल वडमारे तसेच आनंद साळवे व राजू चव्हाण या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

      निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारला होता आणि हिंदू धर्माचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांचे नाव कोणत्याही प्रकारे हिंदू धार्मिक संज्ञेशी जोडणे अनुचित असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच "भीमतीर्थ" हा हिंदू धार्मिक संदर्भात वापरला जाणारा शब्द असून, लोणावळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला तो शब्द जोडणे म्हणजे त्यांच्या विचारधारेचा विपर्यास असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

     रिपाइं (सचिन भाऊ खरात गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ शुद्धिपत्रक जारी करून "भीमतीर्थ" शब्दप्रयोग चुकीने झाला असल्याचे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि पुढील टप्प्यात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ, आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून, "महामानव" ही पदवी त्यांनाच दिली गेली आहे. तरी काही माध्यमांमध्ये सर्वच महापुरुषांना "महामानव" संबोधले जात असून, हे डॉ. आंबेडकर यांच्या विशेष ओळखीचा अपमान असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. आंबेडकरी समाज व रिपाइं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनात तातडीने कारवाई करून समाजातील तणाव टाळावा, अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना रिपाइं (सचिन भाऊ खरात गट) पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष राहुल वडमारे म्हणाले, स्मारकाला भीमतीर्थ हा शब्द वापरणे योग्य नाही, त्यामुळे येथील पावित्र्य धोक्यात येऊ शकते. माध्यमांनी देखील येथील स्मारक सुशोभीकरण बाबत वृत्त प्रकाशित करताना भीमतीर्थ हा शब्द प्रयोग करू नये असे म्हटले आहे.

इतर बातम्या