Maval News l हुल्लडबाज पर्यटकांमुळे आंदर मावळातील नागरिक त्रस्त, पोलिसांनी योग्य नियोजन करावे - राजेश खांडभोर

लोणावळा : हुल्लडबाज पर्यटकांमुळे आंदर मावळातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लोणावळ्यात घडली अशी घटना आंदर मावळात घडणार नाही याकरिता पोलिसांनी योग्य ते नियोजन करावे अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी वडगाव पोलिसांना दिले आहे.
राजेश खांडभोर म्हणाले, आंदर मावळच्या पश्चिम पट्टात अलीकडे मोठया प्रमाणावर पर्यटक येऊन निसर्ग चा आनंद घेत असतात. त्यामध्ये माऊ व गभालेवाडी मोरमारे वाडी येतील धबधबा, वडेश्वर मधील अनेक छोटे मोठे धबधबे, शिंदेघाटेवाडी येतील पुरातन असे शिवघाटेश्वर मंदिर, वडेश्वर येतील टाटा चे ठोकळवाडी धरण, बोरीवली येतील अंजनीमाता मंदिर, कांबरे येतील पांडव कालीन लेणी, डाहुली येतील बेंदेवाडी लालवाडी येतील धबधबा व खांडी येतील 18 नंबर पॉईंट, वरसुबाई माता मंदिर व टाटा धरण चा निसर्गरम्य परिसर व इतर ठिकाणी पर्यटक पर्यटना चा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे अंदर मावळ मधील काही परिवारांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अलीकडे काही हुल्लडबाजी पर्यटकांमुळे आंदर मावळ मधील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे, हे नाकरून चालणार नाही. 2016 मध्ये पर्यटक व गावकरी यांच्या वाद होऊन वडेश्वर चे उपसरपंच यांना आपला जीव गमवावा लागल आहे. तसेच हौशी व हुल्लडबाज पर्यटकांमुळे शेतात काम करणारे शेतकरी वर्ग व आंदर मावळ मधून तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी जाणार कामगार व दुग्ध व्यवसाय करणारे व शाळेकरी मुले यांना काही पर्यटक त्रास देतानाच्या घटना देखील घडल्या आहेत. रस्त्यावर कशीही वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याने चालणे देखील मुश्किल होते. त्यामधून वादाचे व भांडणाचे प्रकार घडत आहे.
जे परिवार सोबत पर्यटक येतात ते निसर्गाचा आनंद घेतात व सुखरूप जातात. पण काही हुल्लडबाजांमुळे निसर्ग चा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन करावा लागतो आहे. आंदर मावळातील निसर्ग सौंदर्य व येथील पर्यटन कायम राखण्यासाठी योग्य उपाय योजना करणे तसेच पोलीस बंदोबस्त नियुक्ती करणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी राजेश खांडभोर यांनी केली आहे.