Breaking news

महाराष्ट्रातील गोशाळांसाठी ‘समस्त महाजन ट्रस्ट’ कडून अडीच कोटींचे आर्थिक सहकार्य; देशी गोसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई : समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध गोरक्षक ट्रस्टना एकूण अडीच कोटी रुपयांचे धनादेश आज घाटकोपर येथील पारसधाम येथे आयोजित कार्यक्रमात वितरित करण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमामुळे देशी गो संवर्धनासाठी फार मोठा हातभार लागणार आहे. रविवारी (4 मे) रोजी हा कार्यक्रम पार पडला.

       या कार्यक्रमाला राष्ट्रसंत नम्रमुनिजी, केंद्रीय मंत्री कपिल मिश्रा, तसेच गोरक्षक आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा आणि आयोगाचे सर्व सदस्य प्रमुख उपस्थित होते.

        महाराष्ट्र शासनाने देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रत्येक गाईमागे दररोज 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील काही गोशाळांनी अद्याप शासनाकडे नोंदणी न केल्यामुळे त्या या अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे समस्त महाजन ट्रस्टचे ट्रस्टी श्री. गिरीशभाई शहा यांच्या पुढाकाराने अशा नोंदणीपासून वंचित असलेल्या गोशाळांना संपूर्ण वर्षासाठी दररोज प्रति गाई 50 रुपये या प्रमाणे मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले, ज्याची एकूण रक्कम अडीच कोटी रुपये झाली.

      या उपक्रमाबद्दल बोलताना श्री. शेखर मुंदडा यांनी समस्त महाजन ट्रस्टचे आभार मानले आणि सांगितले की, "या उपक्रमामुळे महाराष्ट्रात देशी गाईंचे रक्षण आणि संगोपन मोठ्या प्रमाणात होईल." यावेळी राष्ट्रसंत नम्रमुनिजी आणि केंद्रीय मंत्री मिश्राजी यांच्या हस्ते मुंबईतील गुरांसाठी विशेष ॲम्बुलन्स सेवा देखील प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात प्रकाशभाई पोरवाल यांनी गायरान जमिनीचा उल्लेख करत सांगितले की, "गायरान जमिनीवर चारा उत्पादन घेतल्यास गुरांना चाऱ्याची कमतरता भासणार नाही असे सांगितले."

      या कार्यक्रमात श्री. गिरीशभाई शहा, श्री. परेशभाई शहा, श्री. रमेशभाई ओसवाल आणि श्री. प्रकाशभाई पोरवाल यांच्यासह विश्व हिंदू परिषदचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 52 टन गोमांस पकडून मोठी कारवाई करणाऱ्या हिंदू समिती, लोणावळाचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. समारोप करताना परेशभाई शहा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

इतर बातम्या