जिल्हाधिकारी पुणे यांचा 5 जून रोजी लोणावळा दौरा; भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल, भाजी मार्केट, भुशी धरण व लायन्स पॉईंट ची करणार पाहणी

लोणावळा : पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे पाच जून रोजी लोणावळा शहराचा दौरा करणार आहेत. लोणावळा शहरांमधील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी सकाळी दहा वाजता करणार आहेत. त्यानंतर लोणावळा भाजी मार्केट हा मागील अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प याची देखील पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरातील विविध विकास कामे व रखडलेले प्रकल्प याबाबत आढावा बैठक संपन्न होणार आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असताना देखील केवळ तांत्रिक बाबीची पूर्तता न करता हाताताईपणाने सुरू केलेले नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील तीन ते चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या कामामधील भूसंपादनाची महत्त्वाची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तसेच पुलाच्या कामाची अलाइनमेंट चेंज झाल्यामुळे तीन उभे केलेले काम तोडून ते बाजूला करावे लागणार आहेत त्या देखील बदलाची पाहणी जिल्हाधिकारी करणार आहेत. लोणावळा मुख्य बाजारपेठे मधील भाजी मार्केट हा मागील अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प कशा पद्धतीने सुरू करता येईल याची देखील पाहणी केली जाणार आहे.
लोणावळा शहर हे पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध आहे पावसाळी पर्यटनासाठी येतील भुशी धरण या ठिकाणी दर शनिवार रविवारी किमान एक लाख व त्याहून अधिक पर्यटक येत असतात त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कशा पद्धतीने सुविधा दिल्या जाव्यात याची देखील पाहणे या दौऱ्या दरम्यान होणार आहे. लोणावळा शहरालगत असलेले लायन्स पॉईंट हे देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी ग्लास स्काय वॉक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला आहे त्या देखील जागेची व पॉईंटची पाहणी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त लोणावळा शहरांमधील नागरिकांच्या इतर समस्या याचा देखील आढावा सदरच्या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.