Breaking news

अखेर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बॅटरी हिल ते अंडा पॉईंट दरम्यानच्या रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात


लोणावळा : मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल ते अंडा पॉईंट दरम्यान संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता. सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले असताना व वारंवार या ठिकाणी अपघात घडत असताना देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीचे याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करत होती. मागील काही महिन्यांपासून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असताना देखील त्या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करणारी आयआरबी कंपनी व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळ वाहन चालकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत होते. याबाबतचा व्हिडीओ मावळ माझा न्युज नेटवर्क कडून प्रसिध्द करण्यात आला होता. त्याची दखल घेत आयआरबी कंपनीच्या वतीने या ठिकाणी आज 15 मे पासून डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 

      जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. खोपोली लोणावळा दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार चाकी गाड्या व प्रवासी बस यांच्यासह स्थानिक वाहनांची सातत्याने वर्दळ असते. दुचाकी देखील या मार्गावरून सतत प्रवास करत असतात या सर्वांना या खड्ड्यामुळे रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अनेक वेळा वाहने या खड्ड्यांमध्ये आढळतात वाहनांचा वेग कमी होऊन अपघात होत असे. मागील काही महिन्यांपासून दैनंदिन हा खेळ सुरू असताना देखील या रस्त्यावरून नित्यनेमाने ये जा करणारे आय आर बी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांना हे खड्डे कसे दिसत नाहीत हा एक प्रश्न यानिमित्त उपस्थित केला होता. याची दखल आयआरबी कंपनीने घेतली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसापासून ची ही समस्या सुटत असल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील तावरे यांनी देखील हे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा आय आर बी कंपनीला दिला होता.

इतर बातम्या