Breaking news

“मामाच्या गावाला जाऊ या” या उपक्रमांतर्गत अनाथ आश्रमातील मुलांनी घेतला डायनासोर पार्क व बोटिंग मध्ये फिरण्याचा आनंद

लोणावळा : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. लहान मुले सुट्ट्यांमध्ये आपल्या मामाच्या गावाला जात सुट्ट्यांचा आनंद लुटत असतात. मात्र ज्यांना कुटुंबच नाही, आपले असे कोणी नाही, अशा अनाथ मुलांनी हा आनंद कसा साजरा करायचा? याकरिता लोणावळ्यातील जयहिंद लोक चळवळ यांच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांसाठी “मामाच्या गावाला जाऊ या” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत नांगरगाव येथील अनाथ आश्रमातील वीस मुलांना त्यांनी औंढे या ठिकाणी असलेल्या डायनासोर पार्कची सफर घडवली. खंडाळा तलावातील बोटिंग मध्ये या मुलांनी मनमुराद असा बोटिंगचा आनंद घेतला. राजमाची गार्डन या ठिकाणी घोडे व उंट यांची सफर या मुलांसाठी खास आयोजित करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी जाण्याचा व त्या ठिकाणी खेळण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यांच्या सकाळच्या नाश्त्याची व दुपारच्या जेवणाची सोय देखील जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने करण्यात आली होती.

     जयहिंद लोक चळवळीचे प्रमुख निखिल कवीश्वर, आदित्य पंचमुख, श्रवण चिकणे, मंगेश बालगुडे, सूर्यकांत औरंगे, अमित बारसे, शुभम जोशी, लोणावळा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमुख विनोद होगले, लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मावकर, लक्ष्मण दाभाडे, अविनाश तिकोने,मंगेश कचरे, नरेंद्र निकाळजे, फिरोज शेख, निखिल गायखे, गणेश कडू, उदय लाड आदींच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाला डायनासोर पार्क या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली.

     याविषयी बोलताना निखिल कवीश्वर म्हणाले, लहान मुलांना मामाच्या घरी जाण्याचा व त्या ठिकाणी सुट्ट्या साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र जी मुले अनाथाश्रमामध्ये राहतात ज्यांना स्वतःचे असे कुटुंब नाही, नातेवाईक नाही अशा मुलांनी हा आनंद कोठे साजरा करायचा हा विचार मनात आल्यानंतर जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून या मुलांसाठी मामाच्या गावाला जाऊ या ही संकल्पना पुढे आली. सर्व सदस्यांनी यावर विचार विनिमय करत आज या मुलांना हा मामाच्या गावाला जाण्याचा आनंद मिळवून दिला आहे. डायनासोर पार्क, बोटिंग, घोडे, उंट याची सफर याचा आनंद घेत असताना या मुलांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हा मनाला समाधान मिळवून देणारा होता. उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. पुढील काळामध्ये लोणावळा परिसरामधील विविध अनाथ आश्रमांमधील मुलांसाठी असे विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. सोबतच जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामध्ये नशा मुक्त अभियान देखील राबवले जात आहे.

इतर बातम्या