Breaking news

लोणावळा नगरपरिषदेच्या नांगरगाव शाळेतील मुलांना स्कूल बॅग, रेनकोट, वह्या व शालेय साहित्यांचे मोफत वाटप

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यालय नांगरगाव या शाळेत शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज सर्व मुलांना शालेय साहित्य ज्या मध्ये स्कूल बॅग, रेनकोट, वह्या, कंम्पास पेटी, वाॅटर बाॅटल व खाऊ तर शाळेसाठी पंखे यांचे मोफत वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दुसर्‍या दिवशीच मुलांना सर्व साहित्य मोफत मिळाल्याने मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणित झाला होता. 

     नांगरगाव शाळेत शिकणारी बहुतांश मुले ही कातकरी समाजातील आहेत. अतिशय कष्टकरी व गरजु लोकांची मुले या शाळेत शिकत असल्याने पालकांना मुलांच्या गरजा भागविताना देखील अडचणी येतात मात्र दानशूर व्यक्तिच्या दातृत्वाने आमच्या मुलांना काही कमी पडत नाही अशा भावना यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका अनुराधा गोतरणे व शिक्षिका स्वाती येवले यांनी व्यक्त केल्या.

   शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व लिलावती रुग्णालयातील ज्येष्ठ न्युरो सर्जन व प्रख्यात डाॅक्टर पी. एस. रमानी, ट्रस्टचे सचिव भुषण जॅक, सदस्य किशोर कुलकर्णी, जयंत गायतोंडे, विनायक पंडित, संजय दिवाडकर, स्वप्निल पंडित, संजय कुलकर्णी, सतिष दाभोळकर, डाॅ. दिपक देसाई, मनशक्ती प्रयोग केंद्राचे मुख्य विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, शिवसेना लोणावळा शहर संघटक सुभाष सोनवणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदिप थत्ते, शिवसेना महिला उपशहरप्रमुख मनिषा भांगरे, सामाजिक कार्यकर्ते संदिप कांबळे, वसुंधरा नितिन दुर्गे, राजु येवले, नांगरगाव शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका अनुराधा गोतरणे, शिक्षिका स्वाती येवले, निलम कडाले, शुभांगी पालकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना डाॅ. रमानी यांनी मुलांना आर्शिवाद दिले. भुषण जॅक म्हणाले, आम्ही मागील अनेक वर्षापासून ही शाळा पहात असून या शाळेसाठी व मुलांसाठी काहीतरी करण्याची आमची मनापासून इच्छा होती. त्यामधूनच जे सूचत गेले ते वाटप केले आहे. मुलांनी देखील याचा लाभ घेत शिक्षणाकडे लक्ष द्यावे. कष्टावर मात करुन जे पुढे गेले तेच मोठे झाले हा इतिहास असल्याने मुलांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीय करावे व शिक्षक वर्गाने देखील विद्यार्थी घडविण्याचे शिवधनुष्य पेलावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रमोदभाई शिंदे यांनी मुलांशी गप्पा मारत त्यामधून त्यांना मोठी स्वप्न पाहण्याचा व ती पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला तसेच मनशक्ती माईंड जीम मध्ये येण्याचे आमंत्रण दिले.

     शाळेच्या शिक्षिका स्वाती येवले व निलम कडाले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

इतर बातम्या