Operation sindoor l भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोणावळ्यात तिरंगा रॅली संपन्न

लोणावळा : भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोणावळा शहरांमध्ये आज ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. हातामध्ये तिरंगा झेंडा घेत भारत माता की जय अशा घोषणा देत लोणावळाकर नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर धर्म विचारत हल्ला करत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. महिलांच्या समोर त्यांच्या पतींना निर्दयीपणाने गोळ्या मारण्यात आल्या होत्या. याचा बदला घेण्यासाठी भारत सरकार व भारतीय सैन्य दलाच्या वतीने मिशन सिंदूर हे अभियान राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. भारताने घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे पाकिस्तानला अखेर नमते घेऊन माफीनामा द्यावा लागला. भारतीय सैनिकांनी केलेल्या या शौर्याबद्दल व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र मिशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली जात आहे. लोणावळा शहरात देखील आज गुरुवारी 22 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. महिलांची संख्या उल्लेखनीय होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. त्या ठिकाणी काही माजी सैनिक व वीरपत्नी यांचा देखील शाब्दिक सन्मान करण्यात आला.