Breaking news

लोणावळ्यात “आईच्या नावाने एक झाड” वृक्षारोपण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात

लोणावळा : “आईच्या नावाने एक झाड” या अमृत कृती संगम आणि DAY NULM अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या विद्यमानाने कृती संगम अंतर्गत बचत गटांच्या महिलांनी 21 मे पासून झाडे लावणे आणि झाडे संगोपन करण्याच्या कार्यक्रमात पहिल्या टप्प्याला सुरुवात केली.

       खंडाळा तलावाच्या बाजूने झाडे लावण्याच्या बाबतीत हिरकणी बचत गटांच्या महिलांकडून झाडे लावण्या बाबत पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावेळी कर निर्धारण अधिकारी विद्या कारचे, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड, उपजीविका केंद्राच्या संगीता पवार, सीमा पवार, संगीता विरभद्रे, पूजा राठोड तसेच हिरकणी बचत गटाच्या अध्यक्ष अश्विनी काकडे तसेच अन्य महिला उपस्थित होत्या. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी अमृत कृती संगम अभियानाची माहिती दिली.

       अभियानांतर्गत खंडाळा तलावाच्या बाजूने 20 झाडे लावण्याचे काम खंडाळा येथील हिरकणी बचत गटाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. सदरील वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी होणार आहे. आणि या वृक्षाच्या संगोपनाचे काम हिरकणी गटाच्या महिला पुढील दोन वर्षापर्यंत करणार आहेत.

21 ते 23 मे या कालावधीत सर्वेक्षणाचा पहिला टप्पा

अमृत आणि DAY NULM अभियानाच्या समूह कृती संगम अंतर्गत पहिल्या टप्प्यात वृक्षारोपण करण्यासाठी जागांची पाहणे व निश्चितीकरण करण्यात येणार आहे. 21 मे रोजी खंडाळा तलाव परिसरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. 22 मे रोजी सकाळी रामनगर येथे तुळजाभवानी गटाच्या वतीने साईट सर्वेक्षण होणार आहे. तर 23 मे रोजी हनुमान टेकडी येथे बुद्धरत्न बचत गटाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अशी माहिती नोडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी दिली.

इतर बातम्या