भीषण वास्तव l लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या फणसराई येथे पाण्याची भीषण टंचाई; पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते चार ते पाच किलोमीटरची पायपीट

लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या फणसराई या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. एकीकडे मावळ तालुक्यात सर्वत्र जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी पोचवण्यासाठी सुरू असलेली योजना पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे याच मावळ तालुक्यातील एक अविभाज्य भाग असलेल्या फणसराई येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे.
फणसराई ही वस्ती लोणावळा शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. पंचतारांकित अशा डेला ऍडव्हेंचर क्लब पासून काहीच अंतरावर ही धनगर व कातकरी लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी साधारणतः 15 ते 18 कुटुंब असून त्या ठिकाणी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खोदलेल्या विहिरी मधून त्यांना 8 ते 10 महिने पिण्याच्या पाण्याची सोय होते. मार्च महिन्यानंतर मात्र या विहिरीमधील पाणी जवळपास संपलेले असल्यामुळे पुढील दोन ते अडीच महिने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. डोंगराच्या मागील बाजूला असलेल्या धरणावर पाण्यासाठी या लोकांना जावे लागते. हंडाभर पाण्यासाठी येथील हातावर पोट असलेला समाज सोसत असलेले कष्ट, याची प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील या ठिकाणी लक्ष देत या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राजमाची किल्ला परिसरात जाताना फणसराई ही वस्ती आहे. या परिसरातील रस्ता देखील अतिशय खराब झालेला असल्यामुळे पिण्याचे पाण्याचे टँकर देखील या ठिकाणी येण्यास चालढकल करत असतात व पैसे देखील दुप्पट आकारतात. त्यामुळे ते येथील नागरिकांना परवडणारे नसल्यामुळे येथील नागरिकांची दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होत असलेली पिण्याच्या पाण्याची अडचण ही सोडवण्यासाठी शासनस्तर, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेत एक हात मदतीचा पुढे करणे गरजेचे आहे.
पावसामुळे राजमाची कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था
मागील आठवडाभरापासून लोणावळा शहर व परिसरामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच मंगळवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे राजमाची किल्ला परिसरात जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. नागरिकांना या ठिकाणाहून जाताना व येताना मोठी कसरत करून जावी लागत आहे वाहने देखील कित्येक किलोमीटर लांबच उभे करावी लागत आहेत. रस्ता व वीज या भागात अद्याप पोचलेली नसल्यामुळे येथे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राजमाची परिसरातील पर्यटन घटले असल्याचे चित्र देखील मागील काही काळापासून दिसून येत आहे. हा सर्व परिसरात संरक्षित वन क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.