'उत्तम पालकत्वाची सुरुवात प्रेम, संयम आणि आदर्शाने होते' : पूज्य माताजी स्वामिनी ध्यानानंद सरस्वती यांचे लोणावळ्यात उद्बोधक मार्गदर्शन
लोणावळा : "आजची मुले ही उद्याची युवा पिढी आणि देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यामुळे त्यांना उत्तम संस्कार आणि मानवतावादाची शिकवण देणे ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. उत्तम पालकत्वाची खरी सुरुवात ही प्रेम, संयम आणि पालकांनी स्वतः मुलांसमोर आदर्श घालून देण्यापासून होते," असे प्रतिपादन 'आरश विद्यामंदिर'च्या परमपूज्य माताजी स्वामिनी ध्यानानंद सरस्वती यांनी केले.
लोणावळा येथील 'हॉटेल चंद्रलोक' येथे 'लोणावळा वुमन्स फाउंडेशन'च्या वतीने 'उत्तम पालकत्व' या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. या व्याख्यान रूपी सेवेसाठी लोणावळा शहरातील विविध क्षेत्रांतील सुमारे ३०० हून अधिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संवाद आणि नैतिक मूल्यांची गरज
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात पूज्य माताजी म्हणाल्या, "संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी पालक आणि शिक्षक हे सातत्याने प्रयत्नशील असतात. मात्र, बदलत्या काळात विद्यार्थ्यांना योग्य वयात नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन मिळणे तितकेच गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत समाजामध्ये संवाद कमी होत चालला असून, त्यामुळे मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांमध्ये खेळकर वृत्ती, कामाप्रती शिस्त, मोठ्यांचा आदर आणि लहानांविषयी करुणा निर्माण करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या बोलण्यातून आणि नात्यांमधून मुलांवर समजूतदारपणाचे संस्कार बिंबवले पाहिजेत."
डिजिटल युगात योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व
इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावावर भाष्य करताना माताजींनी स्पष्ट केले की, "आजच्या डिजिटल युगात माहितीचे अगणित स्त्रोत उपलब्ध आहेत. मात्र, त्यातील नक्की कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि कोणते ज्ञान आत्मसात करावे, याचे योग्य वयात आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुले हेच आपल्या देशाचे भविष्य असल्याने त्यांना संस्कारक्षम आणि सुरक्षित बनवणे ही समाज म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
लोणावळा वुमन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा माजी नगरसेविका श्रीमती ब्रिंदा अनिश गणात्रा यांनी या अत्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. या व्याख्यानामुळे उपस्थित सर्व महिलांना पालकत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा मिळाली असून, कार्यक्रमाचा उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव पडल्याचे पाहायला मिळाले.
























