आम्ही लोणावळेकर ‘मदत नव्हे कर्तव्य’ या भावनेतून लोणावळा शहरातील एक हजार पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी साहित्यांचे वाटप
लोणावळा : लोणावळा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आम्ही लोणावळेकर या टॅगलाईन खाली एकत्र येतात मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून लोणावळा शहरातील 1000 पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
पाच सहा व सात जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरात पूर्व परिस्थिती निर्माण होत वेगवेगळ्या भागातील एक हजारों अधिक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आकाशातून कोसळणारा पाऊस व त्यातच टाटा धरणांमधून लोणावळा शहरांमध्ये आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे नागरी वस्त्यांमध्ये काही ठिकाणी आठ ते दहा फूट तर काही भागांमध्ये चार ते पाच फुटापर्यंत घरामध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
लोणावळा शहरातील नागरिकांवर आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना करण्यासोबतच त्यांना पुन्हा उभे करणे ही लोणावळा शहर म्हणून आपली जबाबदारी असल्याच्या भावनेतून मदत नव्हे कर्तव्य यातून लोणावळा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत 1000 संसार उपयोगी किट तयार केले असून त्याचे वाटप आज 22 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्त नागरिकांना आम्ही लोणावळेकर यांच्या वतीने घरोघरी जाऊन कुपन देण्यात आले होते. लोणावळा औद्योगिक वसाहती मधील लोणावळा बाजारच्या मागील हॉलमध्ये हे साहित्य वाटप सुरू आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती दीपा मंगेश आगरवाल यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये मावळ वार्ता फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर किरण गायकवाड, लोणावळा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष संदीप कोराड, मगनलाल फूड प्रॉडक्ट चे संचालक मंगेश आगरवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळुंज, नितीन अग्रवाल, बाळासाहेब फाटक, जितेंद्र कल्याणजी, आशिष बुटाला, नवीन भुरट, बापूलाल तारे, मनीषा भंबोरी, बाबुभाई शेख, भरत तिकडे, संदीप वर्तक, संजय अडसुळे, ज्ञानेश्वर येवले, रवी सलोजा, शशी भाभी अगरवाल, औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष शितल पतंगे व त्यांचे सहकारी हे साहित्य नागरिकांना वाटप करत आहेत.
मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून लोणावळा शहरातील मगनलाल चिक्की प्रॉडक्ट्स, लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहत, मावळ वार्ता फाउंडेशन, नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, जे.बी.के.एम. इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड अँड राज ओव्हरसीज मुंबई, कैम नेटवर्कस् लोणावळा, श्री सौराष्ट्र दसा श्रीमल जैन भोजनालय, श्री वागड जैनम चॅरिटेबल ट्रस्ट, हॉटेल रीजेंट, श्री पाटीदार सेवा समाज, कर्तव्य सेवा मित्रपरिवार, कपल भवन लोणावळा, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट लोणावळा, महाराष्ट्र रिक्षा पंचायत शाखा लोणावळा आधी संस्थांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.
साधारणपणे एका कुटुंबाला एक महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य साहित्य, सोबतच गादी, उशी, चादर, ब्लॅंकेट, टॉवेल व इतर वस्तू यांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या ज्या नागरिकांना मदतीचे कूपन्स देण्यात आलेले आहेत, त्यांनी लोणावळा बाजार शेजारील सांस्कृतिक हॉल मधून आपले कुपन दाखवत सदर साहित्य घेऊन जावे. ज्यांच्याकडे वाहने नाही त्यांना घरपोच सेवा दिली जाणार आहे.
























