आनंदवार्ता l जगद्गुरु संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाळासाहेब भरत येवले यांची निवड

लोणावळा : जगद्गुरु संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मारुती उर्फ बाळासाहेब भरत येवले यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच व्हॉइस चेअरमन पदी संतोष राऊत, सचिव पदावर किरण हुलावळे तर तज्ञ संचालक म्हणून लक्ष्मण शेलार व रघुनाथ मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कार्ला या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतेच पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी वरील सर्व पदांसाठी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने सर्वांची एक मताने निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश निखारे यांनी काम पाहिले. यावेळी पतसंस्थेचे संचालक व श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संतोष राऊत, किरण हुलावळे, मारुती येवले, अमोल केदारी, सुरेश कडू, राजू देवकर, गणपत विकारी, गणपत भानुसघरे, सोनाली जगताप, अलका खांडेभरड, सुनील शिर्के, मारुती देशमुख, हरीश कोकरे, मुख्य आधारस्तंभ भरत गबळाजी येवले आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सात वर्षांपूर्वी ही पतसंस्था सुरू करण्यात आली होती. मागील सात वर्षांमध्ये संस्थेचे कामकाज अतिशय उत्तम रित्या सुरू असून संस्थेच्या माध्यमातून लहान मोठ्या व्यवसायिकांना व शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. बचती बाबतच्या विविध योजना पतसंस्थेने सुरू केल्या आहेत त्याचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. पुढील काळामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना कर्ज पुरवठा करत त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे या निवडीनंतर नूतन अध्यक्ष मारुती उर्फ बाळासाहेब येवले यांनी सांगितले.