सदापुर आंबेकर मळा येथे तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित; शेतकरी व नागरिक हैराण

लोणावळा : सदापुर आंबेकर मळा येथे मागील तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला असल्याने त्या भागात राहणारे नागरिक व शेतकरी हैराण झाले आहेत. रोहत्र जळाल्याने हा वीज पुरवठा खंडित झाला आहे. मागील वर्षी 16 सप्टेंबर रोजी आमदार सुनील शेळके यांनी येथील विजेची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ राजगुरुनगर येथील कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन नवीन रोहित्र बसविण्याबाबत सूचित केले होते. मात्र अद्याप पर्यंत रोहित्र न बसविल्याने या भागात विजेची समस्या भेडसावत आहे. आंबेकर मळा या ठिकाणी 10 ते 12 कुटूंब असून प्रत्येकाचा शेती हा व्यवसाय आहे. शेती संदर्भातली सर्व कामे ही लाईटवर असल्याने कामे देखील ठप्प झाली आहे. याकरिता वीज वितरण कंपनीने तत्काळ ही समस्या सोडवत येथे नवीन वीज रोहित्र बसवावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.