Pawna Dam l पवना धरण परिसरात जोरदार पाऊस; 24 तासांत 102 मिमी, धरणात 47.64% पाणीसाठा

लोणावळा (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील पवना धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत (सोमवारी सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6) तब्बल 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून सध्या पवना धरण 47.64 % टक्के भरलेले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याच्या अनेक भागांना जलपुरवठा करणाऱ्या या महत्त्वाच्या जलसाठ्यात यंदा सुरुवातीपासूनच समाधानकारक पावसामुळे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. जून महिन्यात आजपर्यंत पवना जलाशय परिसरात एकूण 647 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी केवळ 18.38 टक्के पाणीसाठा असल्याने जलसंकटाची भीती निर्माण झाली होती. मात्र यंदा पावसाने दिलासा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाचा सोमवारपासून जोर पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर जोरदार पावसाचे सत्र सुरू असून डोंगराळ भागातील धबधबे आणि नद्या भरभरून वाहू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच पूर्ण क्षमतेने वाहणाऱ्या धबधब्यांच्या परिसरात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.