पवना धरण परिसरामध्ये 119 मिमी पावसाची नोंद; धरण पाणी साठ्यात मोठी वाढ

लोणावळा : मावळ तालुक्यासह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरामध्ये गुरुवारी 24 तासात 119 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणात 40.44% पाणीसाठा उपलब्ध चालू आहे. मागील वर्षी आज मितीला धरणामध्ये केवळ 19% पाणीसाठा उपलब्ध होतात. पवना धरण परिसरामध्ये मे व जून महिन्यामध्ये मिळून 479 मिमी पाऊस झाला आहे.
दरवर्षीच्या मानाने यावर्षी मान्सून घाट माथ्यावर लवकर सक्रिय झाला. मे महिन्याच्या अखेरीस जोरदार अवकाळी पाऊस झाला होता त्याचेच रूपांतर पुढे मान्सून मध्ये झाले त्यामुळे जून महिन्यातच लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये मोठा पाऊस झाला आहे. मागील चार ते पाच दिवसापासून मावळ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे धरणाच्या पाण्यासाठी मोठी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांमध्ये पवना धरणाच्या पाण्यासाठी मध्ये 12.17 टक्के वाढ झाली आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.