Lonavala News l जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेची स्वच्छता व वृक्षलागवड मोहीम

लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 5 जून रोजी लोणावळा नगरपरिषद आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती व वृक्षलागवड मोहिमा राबविण्यात येणार आहेत. हे उपक्रम लोणावळा शहरातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
या विशेष मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी, 5 जून रोजी सकाळी 8 वाजता लोणावळा नगरपरिषद कार्यालयाजवळ होणाऱ्या स्वच्छता व पर्यावरण शपथ कार्यक्रमाने होणार आहे.
या वर्षी "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन" ही संकल्पना घेऊन पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नगरपरिषदेची IEC टीम शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापराबाबत जनजागृती करत आहे.
लोणावळा नगरपरिषदेने नागरिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांना आवाहन केले आहे की, या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. शहराच्या स्वच्छतेसाठी, निसर्गसौंदर्याच्या संवर्धनासाठी आणि हरिततेच्या दिशेने वाटचाल सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.
"चला, एकत्र येऊन लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवूया!"