Breaking news

क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

लोणावळा : क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे सन २०२६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणावळा शहराचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष, लायसेल (LICEL) तथा तांत्रिक संचालक, महाराष्ट्र को-ऑप इंडस्ट्री, सांगली संदीप कोराड हे उपस्थित होते. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष देविदास कडू तसेच संस्थेचे आयएमसी सदस्य आशुतोष आठवले, राजेश येवले व हेमंत पातेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी पदवी प्राप्त सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना भविष्यात आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य व आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. प्रमुख पाहुणे संदीप कोराड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात औद्योगिक क्षेत्रातील कौशल्याचे महत्त्व, बदलत्या औद्योगिक गरजा आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लायसेल च्या वतीने पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी शिकाऊ कामे मिळवून देण्यासाठी सहकार्य व संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

आयएमसी आशुतोष आठवले यांनी आधुनिक उद्योगांमध्ये विकसित होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राप्त कौशल्यांचा योग्य उपयोग कसा करावा, याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संस्थेमध्ये आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच संस्थेतील अजय जाधव, रोहित वराडे, शुभ राम आणि विशाल गभाळे या चार प्रशिक्षणार्थ्यांनी संस्थेच्या वतीने अखिल भारतीय व्यवसात परीक्षा मध्ये संस्थेतून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान प्राप्त केले. त्यांच्या या विशेष यशाबद्दल माननीय नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे व उपनगराध्यक्ष श्री. देविदास कडू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे प्राचार्य दिनेश निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक श्री. रापातवार, तसेच संस्थेतील सर्व निदेशक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून समृद्ध भारत या ध्येयाच्या दिशेने संस्थेचा हा पदवीदान सोहळा प्रेरणादायी ठरला.

इतर बातम्या