Breaking news

लोणावळ्यात पोलिस-जनता संवाद वाढवण्यावर भर; ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा

लोणावळा : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरामध्ये गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलिस आणि जनता यांच्यात थेट व सलोख्याचा संवाद असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले. लोणावळा येथे आयोजित विशेष ‘पोलिस-जनता संवाद’ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

         या कार्यक्रमास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रग्सच्या मुद्द्यावर कठोर कारवाई अन् जनजागृती

युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्सच्या समस्येवर बोलताना शर्मा म्हणाले, ड्रग्सचा विषय पोलिस प्रशासन अत्यंत प्राधान्याने (प्रायोरिटीवर) हातात घेणार आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ड्रग्समुक्तीसाठी विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सामील असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासोबतच समाजात याविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

वाढत्या सायबर क्राईमबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अनोलखी नंबरवरून येणाऱ्या ‘फ्रॉड कॉल’वर लक्ष ठेवा आणि आपला ओटीपी कधीही कोणासोबत शेअर करू नका, असे ते म्हणाले. ५० हजार रुपयांपर्यंतची सायबर फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस स्टेशनमध्ये एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे. पोलिस ते प्रतिज्ञापत्र त्वरित बँकेकडे पाठवून पुढील कारवाई करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यटक आणि स्थानिक सुरक्षेसाठी उपाययोजना

लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने येथे अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि बंगला धारकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व भाडेकरूंची चरित्र पडताळणी करून त्याची सविस्तर माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आर्थिक गुन्ह्यांच्या बाबतीत नागरिकांनी सतत सजग आणि सावध राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाहतूक कोंडी आणि महिला सुरक्षा

लोणावळ्यातील गंभीर बनलेल्या वाहतूक समस्येवर भाष्य करताना त्यांनी सर्व नागरिकांनी व पर्यटकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले. तसेच, महिलांवरील अत्याचाराची कोणतीही तक्रार आल्यास पोलिसांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ आणि सत्वर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

लोणावळ्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ

लोणावळ्यातील वाढती गर्दी आणि पर्यटकांचा ओघ लक्षात घेता, पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्याशी चर्चा करून लोणावळा विभागातील पोलिस अधिकारी व अंमलदारांचा स्टाफ वाढवून देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. विशेषतः शनिवार आणि रविवारी वीकेंडच्या काळात लोणावळ्यात जादा पोलिस कुमक (अतिरिक्त बंदोबस्त) देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शेवटी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिले.

      कार्यक्रमात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी उत्तम आणि आपुलकीचा संवाद ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इतर बातम्या