Breaking news

मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांना जीवे मारण्याची धमकी; लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक वसंत कुटे यांना फोन वरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (23 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

अशोक कुटे यांनी मागील काही दिवसांपासून लोणावळा शहर व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंदे, अमली पदार्थ खरेदी विक्री याबाबत आवाज उठविला होता. मावळ तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात निवेदने देत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. यानंतर मावळातील विविध पोलीस ठाण्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सदरची धमकी दिली गेली असल्याची अशोक कुटे यांची तक्रार आहे. कुटे यांच्या तक्रारीनुसार धमकी देणारे युवक हे मावळातील असून ते अवैध व्यवसाय करणारे आहेत. एकाच फोनवरून तीन जण माझ्याशी बोलले यावेळी मागून इतरही काही आवाज येत होते. थोडक्यात अवैध व्यवसाय करणारे एकत्र येऊन त्यांनी हा धमकी देण्याचा प्रकारे केला आहे.

याविषयी बोलताना लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे म्हणाले, अशोक कुटे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान अशोक कुटे यांच्या समर्थनात मनसेचे मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोणावळा शहर व ग्रामीण भागातील अनेक तरुण मोठ्या संख्येने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात जमले होते. लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांची देखील समूहाने भेट घेत कडक कारवाईची मागणी केली.

इतर बातम्या