Lonavala Crime News l लोणावळ्यात दरोड्याचा थरार: ११.५ लाखांचे दागिने व रोकड लंपास, डॉक्टर कुटुंबासह वॉचमनला बांधून ठेवले

लोणावळा : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास २० ते २२ दरोडेखोरांनी घुसून थरार माजवला. त्यांनी तलवार, कुकरी आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने बंगल्यातील दरवाजे फोडून आत प्रवेश करत, घरातील सर्वांना बांधून ठेवले व ११ लाख ५० हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली. मागील चार वर्षांमध्ये डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा आहे.
ही घटना २७ मे २०२५ रोजी रात्री २.५१ वाजता घडली. फिर्यादी तरुण चंद्रमोहन खंडेलवाल (वय ५८), हे लोणावळ्यातील खंडेगेवाडी येथील रहिवासी असून, त्यांचे चुलते डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या ओम श्री बंगला येथे हा दरोडा घडला. दरोडेखोरांनी बंगल्याचा लोखंडी गेट, मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. त्यांनी बंगल्याच्या पोर्चमध्ये झोपलेल्या वॉचमन अंबादास रायबोने आणि त्याची पत्नी वर्शा यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडात कापड कोंबले. त्यानंतर त्यांनी डॉ. खंडेलवाल व त्यांच्या पत्नीला बेडरूममध्ये बांधून ठेवले.
प्राणघातक हत्यारे दाखवत, "आवाज केला तर ठार मारू" अशी धमकी देत दरोडेखोरांनी १.२५ लाखांचे सोन्याचे कडे, दोन अंगठ्या, सोन्याची चेन, तुलसी माळ, मंगळसूत्र, देवाचे दागिने, ५ लाखांचा डायमंड सेट आणि २५ हजारांची रोख रक्कम असा एकूण ११.५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 310(2), 311, 331(6), 351(3), 127 आणि आर्म अॅक्ट 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध सुरु आहे. दरोडा पडत असताना डॉक्टर खंडेलवाल यांचे पुतणे यांनी लोणावळा शहर पोलिसांना दरोड्या बाबतची माहिती दिली. पोलीस कर्मचारी पोलीस वाहनांमधून त्या ठिकाणी आले त्यांच्यासमोर दरोडेखोरांची टोळी जात असताना देखील पोलिसांनी त्यांना पकडले नाही. यावरून माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला असून त्या दिवशी रात्री ड्युटीवर असणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केली आहेत.