एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेली मोनिका झरेकर व दहावीत मावळ तालुक्यात प्रथम आलेली गौरी शिंदे यांचा लोणावळ्यात सत्कार

लोणावळा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी (क्लास 01) पदावर नियुक्त झालेली लोणावळा शहरातील कुमारी मोनिका बाळासाहेब झरेकर व दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मावळ तालुक्यामध्ये प्रथम आलेली लोणावळा शहरातील कुमारी गौरी गणेश शिंदे या दोघींचाही शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात सत्कार सन्मान करण्यात आला. लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुली कोठेही मागे नाहीत हेच या दोन्ही गुणवंत मुलींनी आपल्या यशा मधून दाखवून दिले आहे. दोन्हीही कन्या या लोणावळा शहरातील असून त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असे यश संपादित केले आहे. सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.