Lonavala News l लोणावळा शहरातील नदी, नाले, गटर्स यांची साफसफाई व स्वच्छता पावसाळा सुरू होण्यापूर्वी करून घ्या - देविदास कडू

लोणावळा : अवकाळी पाऊस लोणावळ्यात सुरू झाला आहे. सात जून पासून लोणावळ्यात मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरातील सर्व नाले, इंद्रायणी नदीपात्र व अंतर्गत गटर्स यांची साफसफाई व स्वच्छता लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने करून घ्यावी अशी मागणी लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक व भाजपाचे गटनेते देविदास कडू यांनी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोबतच लोणावळा शहरात विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्या लाईटची तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी, ज्या लाईटच्या तारा रस्त्यावर खाली लोंबल्या आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्या उंच करून घ्याव्यात अशी देखील मागणी लोणावळा नगरपरिषद व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्याकडे करण्यात आली आहे.
पावसाळा व वाहतूक कोंडी लोणावळा शहरातील मागील अनेक वर्षाची समस्या आहे. पोलीस प्रशासनाने लोणावळा शहरांमधील तसेच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी आत्ताच कृती आराखडा तयार करत त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे देखील मागणी देविदास कडू यांनी लेखी स्वरुपात लोणावळा शहर पोलीस यांच्याकडे केली आहे. वाहने उभी करण्यासाठी ज्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी तात्पुरत्या वाहन तळाची निर्मिती करावी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ज्या ठिकाणी डायव्हर्सन्स आवश्यक आहेत त्या ठिकाणी ड्रायव्हर्सन्स देण्यात यावेत असे कडू यांनी म्हटले आहे.
वीज वितरण कंपनीच्या डीपींची अनेक ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत या तुटलेल्या झाकणाच्या डीपीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याची देखील तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत त्या फांद्या देखील तोडत पावसाळ्यात दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात यावी. एकंदरीतच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जे पूर्वतयारी नियोजन आवश्यक आहे त्याची पूर्तता लोणावळा नगरपरिषद प्रशासन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व लोणावळा शहर पोलीस यांनी करून घेत लोणावळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी देविदास कडू यांनी केली आहे.