Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू

लोणावळा : लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाचे मागील पंधरा दिवसापासून बंद पडलेले काम शनिवार 03 मे पासून पुन्हा सुरू झाली आहे. लोणावळा नगरपरिषदेकडून कामाचे बिल मिळत नसल्याने काम बंद ठेवण्यात आले असल्याचा कांगावा करत ठेकेदाराने सदरचे काम थांबवले होते. मात्र लोणावळा नगरपरिषदेकडून याबाबतचा खुलासा करत फाउंडेशन कामाचे 68 लाख रुपये ठेकेदाराला यापूर्वीच देण्यात आले असून ठेकेदाराचे दुसरे बिल देखील ऑडिट साठी लेखापरीक्षण विभागाकडे देण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर ठेकेदाराने 03 मे पासून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

      लोणावळा शहरातील सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे मागील सहा - सात वर्षांपासून रखडलेले काम मागील वर्षापासून सुरू झाले आहे. या सुशोभीकरण कामासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी dpdc मधून मंजूर झाला आहे. तर इतर फाउंडेशन कामासाठी अंदाजे 94 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. फाउंडेशन काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाची बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे तर सुशोभीकरणाचे उर्वरित काम सुरू असून त्याची बिल ठेकेदाराकडून लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले आहे. सदरची बिलेही तपासण्यासाठी लेखा परीक्षण विभागाकडे देण्यात आली आहेत. स्मारकाच्या ठिकाणी झालेल्या कामाची पाहणी व मोजमाप करण्यासाठी ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने मोजमापे झाली नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये ठेकेदाराने या कामासाठी आणलेला दगड हा निकृष्ट दर्जाचा असल्याने तो बदलण्याबाबत लोणावळा नगरपरिषदेने ठेकेदाराला सूचना केली होती. यानंतर कामगार लग्नकार्यासाठी गावाला जाणार असल्याने आठ दिवस काम बंद ठेवणार असल्याचे ठेकेदाराने लोणावळा नगरपरिषदेला कळवले होते मात्र बाहेर नगरपरिषद बिल देत नसल्यामुळे काम थांबवले असल्याचे सांगत संभ्रम निर्माण करण्यात आला होता. 

     लोणावळा नगरपरिषदेने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शनिवारी तीन मे पासून बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न आणता हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा मानस असल्याचे ठेकेदाराच्या वतीने सांगण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेने देखील योग्य ती कारवाई करत बिले वेळेवर ठेकेदाराला देत काम कसे लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. लोणावळा नगरपरिषद व ठेकेदार यांच्यामध्ये योग्य समन्वय राहिल्यास हे काम निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या

नगरपालिका बिल देत नसल्याचा निव्वळ कांगावा ! ठेकेदारांने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी वापरला निकृष्ट दर्जा दगड; तंबी देताच - कामगार लग्न सोहळ्याला गेले असल्याचे कारण देत थांबवले काम