Breaking news

Rotary Club Lonavala l विजया नितीन कल्याण यांनी स्वीकारला रोटरी क्लब ऑफ लोणावळा चा पदभार

लोणावळा : रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षपदी विजया नितीन कल्याण यांची निवड करण्यात आली. हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या एका भव्य पदग्रहण समारंभात त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक डॉ. महेश कोटबगी आणि असिस्टंट गव्हर्नर भालचंद्र लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    मागील वर्षाचे अध्यक्ष नारायण शारवले, सचिव मोनाली कुलकर्णी आणि खजिनदार जयवंत नलोडे यांनी आपल्या पदांची जबाबदारी अनुक्रमे विजया कल्याण, सचिव मुस्तफा कॉन्ट्रॅक्तर आणि खजिनदार दुरिया रामपूरवाला यांच्याकडे सोपवली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. मागील वर्षाचा वार्षिक अहवाल ॲड. मोनाली कुलकर्णी यांनी सादर केला.

    आपली छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. म्हणूनच, आज समाजहितासाठी झटण्याची खरी वेळ आहे, असे मत रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक डॉ. महेश कोटबगी यांनी व्यक्त केले. कोटबगी पुढे म्हणाले, आजकाल व्यक्ती आणि व्यक्तीमधील संवाद कमी झाला आहे. त्यामुळे मानसिक समस्या वाढत आहेत. रोटरीसारख्या संस्थांच्या माध्यमातून हा संवाद पुन्हा वाढविणे गरजेचे आहे. रोटरी क्लब हे समाजासाठी सतत कार्यरत असते. रोटरीने समाजसेवा करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ दिले आहे, त्याचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी व्हावा. आपण समाजातील अनेकांचे स्वप्न पूर्ण करण्यास कारणीभूत ठरू शकतो. आपण आपल्या आयुष्यात असे काही करावे की, जे आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा. समाजासाठी योगदान देणं हीच खरी जबाबदारी आहे,” असा सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला.

      कार्यक्रमात क्लबमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन रवी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन कल्याण यांनी केले. यावेळी लोणावळा, खोपोली व मावळातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नूतन अध्यक्षा विजया नितीन कल्याण म्हणाल्या, येणारे वर्ष लोणावळा रोटरी क्लब युनिटी फॉर गुड हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन एक सुदृढ समाज निर्माणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या