लोणावळा शहरालगत असलेल्या डोंगरगाव व डोंगरगाव वाडी येथे पाण्याच्या समस्येने महिला हैराण; आंदोलनाचा इशारा

लोणावळा : लोणावळा शहरालगत असलेल्या डोंगरगाव व डोंगरगाव वाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या समस्येने महिला हैराण झाल्या आहेत. दररोज एक तास पाणी सोडून देखील नळांना पाणी येत नसल्याने महिलांना हांडे घेऊन दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. डोंगरगाव वाडी येथील संतप्त महिलांनी याबाबत आमदार सुनील शेळके यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडत यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने कुसगाव डोंगरगाव पाणी योजना चालवली जाते. 2005 साली ही योजना मंजूर झाली होती. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने या योजनेचे पाणी कमी पडू लागल्याने 2019 साली तिची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. 2022 साली ही योजना पूर्ण होणार होती मात्र काही तांत्रिक बाबींमुळे ती अद्याप पूर्ण झालेली नाही. डिसेंबर महिन्यामध्ये या समस्येच्या विरोधात कुसगाव व डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण देखील करण्यात आले होते. त्यावेळी 31 डिसेंबर पर्यंत पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबतच्या शब्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने कार्यकारी अभियंता यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समक्ष दिला होता. असे असले तरी अद्याप योजना पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यातच पाणी योग्य प्रमाणात येत नसल्याने अनेक नागरिक मोटारी लावून पाणी खेचत आहेत. त्यामुळे पुढील घरांना पाणी जातच नाही अशा डोंगरगाव वाडी येथील महिलांची तक्रारी आहेत. वेळोवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व स्थानिक ग्राम पंचायत यांच्याकडे मागणी करून देखील या समस्येवर तोडगा निघत नसल्याने महिलांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
याविषयी बोलताना डोंगरगाव चे सरपंच सुनील येवले म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे डोंगरगाव मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदने देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी उपोषण देखील केले होते, त्यावेळी देखील पुढील आठ ते पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करतो असा शब्द प्राधिकरणाने दिलेला होता. मात्र त्याप्रमाणे अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या गंभीर समस्येची दखल घेत तात्काळ डोंगरगाव येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी डोंगरगाव वाडी येथील महिलांसह ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
मोटारी जप्त करण्याचा ठराव देऊन देखील कानाडोळा
नळाला मोटारी लावून पाणी खेचणाऱ्यांच्या विरोधात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई करा, मोटारी जप्त करा व त्यांचे नळ कनेक्शन कायम स्वरुपी बंद करा असा ठराव डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आला आहे. तरी देखील प्राधिकरण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे सरपंच सुनील येवले यांनी सांगितले. दोन तीन वेळा याबाबत प्राधिकरणाकडे मागणी देखील केली आहे तरी कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे.
डोंगरगाव वाडी मध्ये मोटर वाल्यांची दादागिरी - संतप्त महिला
डोंगरवाडी व डोंगरगाव वाडी मध्ये अनेक भागांमध्ये रोज एक तास पाणी सोडूनही काही महिलांना पाण्यासाठी हंडे घेऊन दारोदार फिरावे लागते. अनेक जण मोटारी लावत असल्याने पाणी सोडूनही पाणी मिळतच नाही. याबाबत अनेक वेळा स्थानिक व प्राधिकरणाकडे तक्रार करूनही आमच्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले जाते. पाहणी करण्यासाठी कुणीही येत नाही. आम्हाला सांगतात की नवीन कनेक्शन आल्यावर पाणी मिळेल. तोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न कोण सोडवेल? मोटार वाल्यांना दहा मिनिटे मोटार बंद करा म्हटले तरी आमच्याशी अरेरावी ची भाषा वापरतात. तसेच पाणी वालाही जेव्हा पाणी सोडतो. तेव्हा पाण्याच्या वाल जवळ अनेक लिटर पाणी वाया जाते. आम्हाला महिलांना एकच वाटते की यावरती एकच उपाय तो म्हणजे सगळ्यांच्या मोटारी बंद करने तरच हा पाणी प्रश्न सुटू शकेल. नाहीतर पाण्याच्या वेळेला लाईट बंद करणे.