Breaking news

खंडाळा घाटातील डोंगरावर थरार ! दरीत तब्बल ५० फूट कोसळली कार; मृत्यूच्या दाढेतून महामार्ग पोलिसांनी चालकाला काढले बाहेर

खोपोली (प्रतिनिधी) : खालापूर तालुक्यातील गारमाळ रस्त्यावर आज (सोमवारी) सकाळी एका थरारक अपघाताची घटना घडली. दरीतील निसर्गरम्य दृश्य पाहण्याच्या मोहापायी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, महामार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसी बचाव मोहिमेमुळे चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दृश्य पाहण्याचा मोह पडला महाग

मिळालेल्या माहितीनुसार, चालक मोहित स्वरूप भटनागर (वय ५१, रा. गुरुग्राम, हरियाणा) हे सोमवारी सकाळी गारमाळ रस्त्यावरून प्रवास करत होते. प्रवास दरम्यान कनेक्टिंग लिंकवरील ब्रिजचे विहंगमय दृश्य पाहण्याच्या मोहापायी त्यांनी कार कच्च्या रस्त्यावर घेतली. मात्र, अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. चार ते पाच पलट्या खात कार तब्बल ५० फूट खाली दरीत जाऊन पडली. अपघाताचे भयानक स्वरूप पाहून उपस्थितांनी चालक वाचण्याची आशाच सोडली होती.

महामार्ग पोलिसांची धाडसी बचाव मोहीम

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत खोल आणि धोकादायक दरीत उतरणे कठीण असतानाही महामार्ग पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे, संतोष गुजरवार आणि गोडसे या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या मोहित भटनागर यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

चालक सुखरूप; पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक

या भीषण अपघातात सुदैवाने चालक मोहित भटनागर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जर महामार्ग पोलिसांच्या मदतीला काही क्षणांचा जरी उशीर झाला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महामार्ग पोलिसांनी दाखवलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परतेमुळे एका नागरिकाचा जीव वाचला असून, या यशस्वी बचावकार्यासाठी महामार्ग पोलीस दलावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या