Kaivalyadham l कैवल्यधाम योग संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त 35 दिवसीय योग महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन

लोणावळा : आंतरराष्ट्रीय योग संस्था अशी ओळख असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त 35 दिवसीय योग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या योग महोत्सवाचे उद्घाटन आज मावळ लोकसभेचे महा संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त 16 मे रोजी सायंकाळी भजन संध्या व 17 मे रोजी दुपारी स्वामी कुवलयानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन देखील करण्यात आले.
शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी सायंकाळी कुडीलाल सक्सेरिया सभागृह, कैवल्यधाम येथे डॉ. पंडित अजय पोहनकर (आंतरराष्ट्रीय प्रसिध्द कलाकार) आणि विदुषी अंजली पोहनकर, प्रख्यात शास्त्रीय गायक व गायिका यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या सुश्राव्य गायानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी व कर्मचारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
शनिवार 17 मे 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता कैवल्यधाम योग संस्था, लोणावळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (आयडीवाय) 35 दिवसांच्या प्रारंभ सोहळ्याचे उद्घाटन मावळ तालुक्याचे खासदार महासंसदरत्न श्री श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या निमित्ताने कैवल्यधाम योग संस्था आयोजित मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, नवी दिल्ली, आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिवस "एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिये योग" या थीम वर आधारित योग महोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय योग दिवस "सामान्य योग प्रोटोकॉल" प्रमाणे कैवल्यधाम संस्थेचे जेष्ठ योग शिक्षक श्री नीरज सिंग यांनी योग प्रशिक्षक श्री जितेश सिंगला आणि कुमारी पूर्वा सातकर यांच्या सहयोगाने योगाभ्यास घेतला. या योग महोत्सवात 500 हुन अधिक लोणावळ्यातील नागरिक, सामाजिक संस्था, लोणावळा नगर परिषद, शहर व ग्रामीण पोलीस, पी.टी.एस. खंडाळा, एल एन्ड टी, मनशक्ती प्रयोग केंद्र, आय.एन.एस. शिवाजी, आर्किटेक्चर ग्रुप, लोणावळा, ग्रेट इस्टर्न एकाडमी, शिवदुर्ग रेस्क्यू ग्रुप, हिंदू समिती, पत्रकार संघ तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी व सहकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस सामान्य योग प्रोटोकॉल प्रमाणे योगाभ्यास वर्गाचा सुखद अनुभव घेतला.
सकाळी 11.00 वाजता संस्थेच्या कुडीलाल सक्सेरिया सभागृहात आध्यात्मिक गुरु पूज्य श्री रमेशभाई ओझा (भाई श्री), संस्थापक, सांदीपनि विद्या निकेतन यांच्या शुभहस्ते "स्वामी कुवलयानंद व्याख्यान माला" चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर भाई श्री यांनी आपल्या भाषाशैलीत "आधुनिक जीवन में अध्यात्मिकता " या विषयावर व्याख्यान दिले आणि उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचे अधिकारी व कर्मचारी कैवल्य विद्या निकेतन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
या तीनही कार्यक्रमांचे आयोजन कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या साजरे करण्यासाठी संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने तसेच योग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.