Lonavala News l लोणावळा शहरातील इंद्रायणी नदीपात्रावर असलेल्या त्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी

लोणावळा : लोणावळा शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रावर उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे. 1958 साली लोणावळा शहरांमध्ये इंद्रायणी नदीपात्रावर हा पूल बांधण्यात आला होता. या पुलावरून लोणावळा शहरातील वाहतूक दैनंदिन सुरू असते. पुलाच्या खालील बाजूने सिमेंट पडले असल्यामुळे लोखंडी सळ्या बाहेर दिसू लागल्या आहेत. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे असल्याचे मत लोणावळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी व्यक्त केले आहे.
रविवारी 15 जून रोजी मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीपात्रावरील एक पूल पडल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून 51 नागरिक जखमी झाले आहे. या घटनेनंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या जुन्या व कालबाह्य झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबतच्या सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. लोणावळा शहरातून जाणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रावर असलेला हा पूल देखील 67 वर्ष जुना आहे. शहरातील बहुतांश वाहतूक याच पुलावरून होत असल्याने त्याचे देखील या निमित्ताने ऑडिट होणे व त्याच्या मजबुतीबाबत तपासणी करून घेणे गरजेचे आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासन तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेने याबाबत दक्षता घेत पुलाच्या मजबुतीबाबत तपासणी करून घ्यावी असे पुजारी यांनी सांगितले.