Lonavala Rain Information l लोणावळा शहरात मुसळधार पाऊस; बुधवारी 24 तासात 221 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : घाटमाथ्यावरील पावसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या लोणावळा शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी 7 ते गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात शहरात 221 मिमी (8.70 इंच) पाऊस झाला आहे. ढगांच्या गडगडाटासह व विजेच्या कडकडाटासह लोणावळ्यात रात्री जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर आज देखील कायम आहे. हवामान विभागाने 23 जूनपर्यंत रायगड व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोणावळा शहरात यावर्षी आज अखेर पर्यंत 1166 मिमी (45.91 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत जेमतेम 323 मिमी (12.72 इंच) पाऊस झाला होता.
मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये,ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे अशा ठिकाणी जाऊ नये तसेच वाहने देखील पाण्यात घालू नयेत.