Breaking news

“आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती”; नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी खोपोली पोलीस सज्ज!

खोपोली (प्रतिनिधी) : “आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर प्रभावी नियंत्रणासाठी खोपोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग, प्रतिबंध आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी केले.

महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या विशेष शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. विशाल नेहूल होते. आपत्तीसमयी त्वरित प्रतिसाद देणे, संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.

सर्व यंत्रणांचा व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग

        या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, यशवंती हायकर्स, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र संघटना आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, औद्योगिक क्षेत्रातील गॅस गळतीसारख्या आपत्ती आणि महामार्गावरील अपघात अशा विविध संकटांच्या वेळी कोणती उपाययोजना करावी, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला. “संकटावर करू मात, देऊ एकमेकांना खंबीर साथ” हा संदेश यावेळी उपस्थितांमध्ये प्रभावीपणे रुजवण्यात आला.

मान्यवरांचे मार्गदर्शन आणि समन्वयाचे आवाहन

शिबिरात खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, परिवहन सभापती किशोर पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन घरत यांनी आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग, आवश्यक समन्वय आणि सर्व घटकांनी एकत्रितपणे कसे कार्य करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

पोलीस दलाकडे आधुनिक संसाधने सज्ज: डॉ. विशाल नेहूल

अध्यक्षीय भाषणात डॉ. विशाल नेहूल म्हणाले की, "खोपोलीतील प्रशासन, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये संकटसमयी एकजुटीने कार्य करण्याची एक सशक्त परंपरा आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाला आधुनिक संसाधने आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे."

'वेळेपूर्वीची तयारी' हेच प्रभावी शस्त्र: पोलीस निरीक्षक सचिन हिरे

खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात “प्रतिबंध, सावधगिरी आणि पूर्वतयारी” या त्रिसूत्रीवर भर दिला. ते म्हणाले की, कोणतेही संकट अचानक येते; मात्र त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वेळेपूर्वीची तयारी, जागरूकता आणि समन्वय हेच आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांनी सर्व घटकांना पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले.

बचाव साहित्यांचे थेट प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन

शिबिरादरम्यान पीएसआय पूजा चव्हाण यांनी खोपोली पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या आपत्कालीन संसाधनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनकडील विविध बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी नगरपालिकेची फायर ब्रिगेड व्हॅन, फायर मॅन बाईक, गोरखा व्हॅन तसेच स्वामिनी संस्थेची ॲम्ब्युलन्स यांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पीएसआय ज्ञानेश्वर एडवले यांनी केले.

खोपोलीकरांचा खंबीर निर्धार

आपत्ती व्यवस्थापनात वेळेवर मिळणारा प्रतिसाद, संसाधनांचे योग्य नियोजन, समन्वयाची मजबूत साखळी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या शिबिराने सर्वांना करून दिली. आगामी काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा धैर्याने व सक्षमपणे सामना करण्यासाठी खोपोली पोलीस आणि नागरिक पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

इतर बातम्या