Breaking news

कारमेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे वनमहोत्सव सप्ताह उत्साहात साजरा

खोपोली (प्रतिनिधी) : कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथे दि. १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात  पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्थानिक व्यवस्थापिका सिस्टर  ज्युली मारिया, मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर  सारूपिया  यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच वर्गशिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले.

    संपूर्ण आठवडाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच वृक्षसंवर्धनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली.

    वनमहोत्सव सप्ताहाचा समारोप प्रसिद्ध वृक्षप्रेमी सौ. उषा केळबाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. तसेच वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर कोणती जबाबदारी स्वीकारावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अधिक बळकट व्हावी हीच भावना आहे.

इतर बातम्या