Breaking news

खोपोलीत स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या नावे स्मृतिस्थळ उभारणीचा संकल्प; गिरनार चौक परिसरात भूमिपूजन उत्साहात

खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली शहरातील गिरनार चौकाजवळ,  कुस्तीगिरांचा पुतळा व स्मृतिस्थळ उभारणीच्या संकल्पनेच्या अनुषंगाने भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे आणि नगरसेविका सानिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

     यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख, गुरुनाथ साठेलकर, भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, कुस्ती प्रशिक्षक बाळा चव्हाण, संकुलातील कुस्तीपटू तसेच असंख्य कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     खोपोली शहरातच नव्हे, तर रायगड जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती या पारंपरिक खेळाला नवी ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे तत्कालीन पदाधिकारी म्हणून तब्बल तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, या उद्देशाने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ लगत वीटभट्टी परिसरात त्यांच्या स्मृतीस समर्पित स्मृतिस्थळ लोकसहभागातून उभारण्याचा संकल्प करण्यात आला.

     याच ठिकाणाहून स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांनी आपल्या कुस्ती प्रवासाची यशस्वी वाटचाल सुरू केली होती. त्यामुळे हे स्मृतिस्थळ भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रसंगी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी परिसराचे सुशोभीकरण, कुस्ती या खेळाचा प्रभावी प्रसार तसेच राष्ट्रीय महामार्गालगत आवश्यक सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांचेही संपूर्ण सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या कार्याला अभिवादन करत, खोपोलीच्या कुस्ती परंपरेचा गौरव जपणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मृतिस्थळ उभारण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

इतर बातम्या