Breaking news

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या थीमनुसार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लोणावळा : सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक २१ जून २०२५ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा कार्यक्रम ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या जागतिक संकल्पनेवर आधारित होता. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध योगासने सादर केली आणि योगशास्त्राचे महत्त्व आत्मसात केले.

      कार्यक्रमाची सुरुवात विशेष प्रार्थना सभेने झाली. या वेळी शाळेचे प्राचार्य प्रा. एन. के. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे ऐतिहासिक व वैज्ञानिक महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, "योग ही एक प्राचीन, सूक्ष्म विज्ञानावर आधारित अध्यात्मिक शिस्त असून शरीर, मन आणि आत्मा यांचा सुसंवाद साधण्याचे माध्यम आहे."

      यानंतर इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांनी योग सत्रात भाग घेतला. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम यांसारख्या विविध योगासनांचा सराव केला. योग शिक्षकांनी प्रत्येक आसनाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्राचार्य सरांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत सहजतेने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तरे दिली. प्राचार्य मिश्रा सर म्हणाले, "योगामुळे केवळ शरीर नव्हे, तर मनही शांत होते. एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. योग ही निरोगी जीवनशैलीकडे नेणारी वाट आहे."

     या कार्यक्रमाचे संकुल प्रमुख डॉ. एम. एस. गायकवाड सर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि योग सादरीकरणाचे कौतुक केले. शाळेच्या संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एन. नवले सर, संस्थापक सचिव डॉ. सौ. सुनंदा नवले मॅडम, उपाध्यक्ष (प्रशासन) सौ. रचना नवले-अष्टेकर आणि उपाध्यक्ष (एच.आर.) डॉ. रोहित एम. नवले यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण कार्यक्रमातून योगाचा शैक्षणिक आणि मानसिक विकासासाठी असलेला प्रभाव स्पष्टपणे अधोरेखित झाला. सिंहगड पब्लिक स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना जीवनशैलीत योगाचा समावेश करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

इतर बातम्या