Breaking news

लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! एचडीएफसी बँकेजवळील जैन मंदिरात मध्यरात्री चोरी

लोणावळा (प्रतिनिधी) – शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर रविवारी पहाटेच्या सुमारास, तुंगार्लीकडे जाणाऱ्या मार्गावर एचडीएफसी बँकेजवळ असलेल्या जैन मंदिरात चोरीची घटना घडली. चार चोरट्यांनी मंदिरात घुसून दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली.

गेल्या आठवड्याभरात घडलेली ही पाचवी चोरीची घटना असून, शहराच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याआधी ठोंबरेवाडी व गवळीवाडा येथील मंदिरांमध्ये चोरी व चोरीच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणात लोणावळा शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत चोरट्यांना अटक केली होती.

त्यानंतर सोमवारी प्रसिद्ध डॉक्टर खंडेलवाल यांच्या निवासस्थानी मध्यरात्री दरोड्याचा प्रकार घडला. त्याच आठवड्यात मंगळवारी, लोणावळा पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या 'पैठणी' साड्यांच्या दुकानातही चोरी झाली.

या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असतानाच पुन्हा एका मंदिरात चोरी झाल्याने पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जैन मंदिरातील चोरीचे दृश्‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, चार चोरटे मंदिरात घुसून दानपेटी फोडत आणि पैसे घेऊन पळताना स्पष्टपणे दिसून येतात. विशेष म्हणजे, चोरट्यांनी चेहरा झाकलेला नव्हता.

मंदिर व्यवस्थापनाकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील सात-आठ महिन्यांपासून दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे चोरी झालेली रक्कम नेमकी किती आहे हे स्पष्ट नाही, मात्र ती लक्षणीय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिराच्या विश्वस्तांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली असली, तरी चोरटे निर्भयपणे नवीन ठिकाणी हात साफ करत आहेत. या सर्व घटनांमुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक नागरिकांत प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे.

इतर बातम्या