Breaking news

लोणावळा ग्रामीण परिसरात पत्नीचा दगड-विटांनी मारहाण करून खून; पती कर्नाटकला पसार होण्यापूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर जेरबंद

लोणावळा : मावळ तालुक्यातील कुसगाव बुद्रुक येथील कारके वस्तीमध्ये पत्नीच्या डोक्यात व शरीरावर दगड आणि विटांनी मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या पतीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे लोणावळा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.

         लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान कारके वस्ती, कुसगाव बुद्रुक येथे दगडू रामू वाघमारे (वय ४५) याने अज्ञात कारणावरून पत्नी काळी दगडू वाघमारे (वय अंदाजे ४० वर्ष) यांच्या डोक्यात तसेच शरीरावर दगड व विटांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

       घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनेनंतर आरोपी दगडू वाघमारे पसार झाला होता. आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भूषण माने आणि महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

       तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्याच्या दिशेने रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करत दगडू रामू वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

       ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या तीन तपास पथकांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भूषण माने करीत आहेत.

इतर बातम्या