Khandala l आती क्या खंडाला ! निसर्गरम्य खंडाळ्याची पर्यटकांना मोहिनी

लोणावळा : पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या प्रसिध्द अशा खंडाळा शहरातील निसर्ग सौंदर्याची सध्या पर्यटकांना भुरळ पडत आहे. बाराही महिने खंडाळ्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. घाटमाथ्यावर नुकताच मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे खंडाळा घाटातील सह्याद्रीची पर्वत रांग हिरवीगार झाली आहे. काचळ दरीतून वाहणारा धबधबा पर्यटकांना क्षणभर थांबण्यास भाग पाडत आहे. राजमाची पॉईंट या ठिकाणावरून दिसणारे डोंगरदऱ्यांमधील विहंगम दृश्य आपल्या नजरेमध्ये व मोबाईल मध्ये साठवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शनिवार रविवार सह इतर सर्वच दिवस मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.
Joint WhatsApp Group For Latest News Update
राजमाची गार्डन मध्ये देखील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. त्या ठिकाणाहून देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगा व हिरवेगार डोंगर तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे दृश्य नजरेस पडत आहे. पुढे सनसेट पॉईंट व ड्युक्स पॉईंट या ठिकाणाहून दिसणारे निसर्ग सौंदर्य, बोगद्यामधून बाहेर पडणारी रेल्वे गाडी, समोरच दिसणारा पर्वत व डोंगरदऱ्यांमधून निघणारे पांढरे शुभ्र धुके हा सर्व नजारा पाहण्यासाठी पर्यटक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. मुंबईच्या जीवघेण्या गर्मी मधून घाट माथ्यावर आल्यानंतर खंडाळा भागामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी वानरसेना हजर असते. शेकडो माकडे अमृतांजन पुलाच्या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेली असतात. पर्यटक देखील या वानर सेनेला आनंदाने मक्याचे कणीस, भुईमुगाच्या शेंगा असे खाद्यपदार्थ खाण्यासाठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोणावळा व खंडाळा ही दोन्ही एकमेकाला पूरक असणारी शहरी आहेत. लोणावळा शहरापेक्षा खंडाळा शहरांमध्ये निसर्ग सौंदर्य व थंड हवा ही पर्यटकांना कायमच हवीहवीशी वाटते. खंडाळा भागातील राजमाची पॉइंट, राजमाची गार्डन, सनसेट पॉईंट, ड्युक्स नोज, खंडाळा तलाव, वाघजाई देवीचे मंदिर ही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. राजमाची पॉइंट येथील धोकादायक पर्यटन रोखण्यासाठी या ठिकाणी दरीच्या बाजूला सुरक्षा भिंत व जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील पर्यटन सुरक्षित झाले आहे.
Joint WhatsApp Group For Latest News Update