Bhushi Dam l पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी

लोणावळा : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले व पावसाळी सौंदर्याने नटलेले लोणावळा शहर पुन्हा एकदा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. लोणावळा शहरातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेले भुशी धरण लोणावळा शहरामध्ये रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे स्थानिक व्यावसायिक व पर्यटक यांनी आनंद साजरा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल पंधरा दिवस अगोदर भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. लोणावळा शहरामध्ये रविवारी रात्री तब्बल 143 मिमी (5.63 इंच) पाऊस झाला आहे. सकाळी देखील पावसाच्या सरी सुरूच होत्या.
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे भुशी धरणाच्या जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला होता. मागील दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे व रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागली आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून लाखो पर्यटक दरवर्षी लोणावळा शहरामध्ये येत असतात. भुशी धरण, लायन्स पॉईंट व सहारा पुलासमोरील धबधबा ही ठिकाणे पर्यटकांसाठी अक्षरशः पावसाळ्यात पर्वणी ठरत असतात. धरण भरल्याची माहिती समजतात लोणावळा व परिसरातील स्थानिक नागरिकांनी कृषी धरणावर जाऊन आनंद साजरा केला. आज सोमवार असल्यामुळे धरण परिसरामध्ये पर्यटकांची संख्या कमी होती मात्र जे पर्यटक होते त्यांनी देखील धरणाच्या पायऱ्यांवर उभे राहत, नाचत आनंद साजरा केला.