शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा; लोणावळा नगरपरिषदेच्या महात्मा गांधी शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ आणि साहित्याचे वाटप

लोणावळा : शालेय जीवनातील पहिला दिवस नेहमीच खास असतो, आणि तो संस्मरणीय करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ७ महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयात आज (१६ जून) "शाळा प्रवेशोत्सव" उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषदेचे मिळकत निरीक्षक मनोज पाटील, शालेय शिक्षण अधिकारी आबासाहेब मनाळकर, तसेच वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य हर्षल होगले उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन आणि गोड खाऊ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण हेच यशाचा खरा मार्ग आहे. नगरपरिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकं, रेनकोट आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच, शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.”
कार्यक्रमास मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी, शिक्षिका सरिता चौधरी, सविता शिंदे, सुवर्णा लाड, भंगारे मॅडम, लीना पार्ट, तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश भुजबळ व बबन कांबळे यांचीही विशेष उपस्थिती होती. या उपक्रमातून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरली.