Lonavala Rain Information l लोणावळा शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम; सोमवारी 109 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे. रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी देखील कायम होता. दिवसभर पावसाची संततधार व अधून मधून जोरदार सरी पडत होत्या. सोमवारी 24 तासात लोणावळा शहरात 109 मिमी (4.29 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसात शहरात 252 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे शहरातील भुशी धरण देखील 15 दिवस लवकर ओव्हर फ्लो झाले आहे.
रविवारी रात्री व सोमवारी झालेल्या पावसामुळे लोणावळ्यातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तुंगार्ली भागातील बद्रि विशाल सोसायटी व आजूबाजूचे रस्ते, बापदेव रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच तुंगार्ली ग्रामीण पोलीस स्टेशन व खंडाळा गावठाण भागात झाडे देखील पडली होती. लोणावळ्यात यावर्षी आजपर्यंत 900 मिमी (35.43 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 310 मिमी (12.20 इंच) पाऊस झाला होता.