Breaking news

Crime News l खालापूर येथील युवकाच्या खूनप्रकरणी लोणावळ्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; मृतदेह दुधीवरे जंगलात आढळला

लोणावळा : खालापूर तालुक्यातील आजिवली येथील ३५ वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह मावळ तालुक्यातील दुधीवरे गावाजवळ जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खून व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मृत व्यक्तीचे नाव हनिफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू (वय ३५) असून त्याच्या पत्नीने १६ जून रोजी वावोशी पोलिस दूरक्षेत्रात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून खालापूर पोलिस ठाण्यात मानवी मिसिंग म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता. पुढील तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत हनिफअली हा शुभम यादव, प्रणय यादव, अमर मोरे आणि आशिष चव्हाण यांच्यासोबत शेवरलेट कारने फिरण्यासाठी मुळशी येथे गेला होता.

१७ जून रोजी सकाळच्या सुमारास मुळशीतील गोशाळेच्या शेडमध्ये आशिष आणि हनिफअली यांच्यात वाद होऊन दोघांनी एकमेकांना लोखंडी हातोड्याने मारहाण केली. यानंतर, त्या दिवशी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास, कारमध्येच चौघांनी मिळून शुभमचा टॉवेल आणि शर्ट वापरून हनिफअलीचा गळा दाबून खून केला व मृतदेह दुधीवरे गावाच्या खिंडीतील जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे हात बांधलेले होते, शर्टाने गळा आवळलेला व तोंडावर टॉवेल होता.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. शुभम राजेंद्र यादव (वय २५, रा. आपटी, ता. खालापूर)
  2. आशिष रामदास चव्हाण (वय २७, रा. डोणवत, ता. खालापूर)
  3. अमर गणपत मोरे (वय २२, रा. झाडानी, ता. खालापूर)
  4. विधीसंघर्षग्रस्त बालक –  (वय १७, रा. आपटी, ता. खालापूर)

सदर घटनेचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत असून पोलिसांनी चौघांविरोधात खून व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

इतर बातम्या