Lonavala News l आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक; लोणावळा घरफोडी प्रकरणातील 30 लाखांचा ऐवज हस्तगत

लोणावळा : लोणावळा शहरातील जुन्या खंडाळा रोड येथील एका बंद घरात झालेल्या घरफोडीप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
दि. 9 जून 2025 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी बिना मुळे (वय 65) यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी यांची मुलगी अबोली हिच्या घरी गेल्यामुळे घर बंद होते. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरातून 47 तोळे सोने आणि 2 किलो चांदी असा सुमारे 29 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
सदर प्रकरणी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. गुन्ह्याचा समांतर तपास करताना लोणावळा स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात तिघे चोरटे रेल्वेने पिंपरी-चिंचवडकडे जाताना आढळून आले. दि. 16 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडगाव मावळ येथे सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे चंद्रकांत ऊर्फ चंदू माने (वय 32, रा. चिंचवडगाव) आणि धनंजय काळे (वय 20, रा. चिंचवडगाव) असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी चोरी केलेला ऐवज दीपक मंदगे (रा. कर्जत) आणि कैलास जाट (रा. वाशी) यांच्या मदतीने विकल्याचे उघडकीस आले. त्यांच्या ताब्यातून 34 तोळे सोने, 2 किलो चांदी असा एकूण 30 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
प्रमुख आरोपी चंद्रकांत माने याच्यावर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड येथे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथील गुन्ह्यातून जामिनावर सुटून आला होता.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाधरे, स्था गु.शा चे पोसई अभिजीत सावंत, लोणावळा शहर पो स्टे चे सपोनि राहूल लाड, पोसई रमेश भिसे, पोसई सूर्यकांत वाणी, स्थागुशा चे पोलीस अंमलदार राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, पोसई मुकुंद कदम लोणावळा शहर पो स्टे पोलीस अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पो स्टे व स्थागुशा चे पथक करत आहेत.